खान्देशजळगांवशासकीय

नगररचना विभागात ‘सेठ’चा हस्तक्षेप, खाजगी पंटरची ढवळाढवळ?

खान्देश टाइम्स न्यूज | ३१ जानेवारी २०२४ | जळगाव शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागातील गलथान कारभाराची मालिका खान्देश टाइम्स न्यूजने प्रसिद्ध केली आहे. नेहमी आर्थिक देवाण घेवाणचे आरोप होत असलेल्या नगररचना विभागात गणेश कॉलनी, रिंगरोड स्थित एका ‘सेठ’ नामक शल्य विशारदचा हस्तक्षेप वाढला असल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर ‘सेठ’सह काही खाजगी व्यक्ती नेहमी फायली या विभागातून त्या विभागात घेऊन कामात ढवळाढवळ करीत असल्याचे सर्रास दिसून येते.

जळगाव शहर मनपातील नगररचना विभाग कायम चर्चेत असला तरी त्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे सर्वश्रुत आहे. जळगाव शहरात ठराविक बिल्डरांच्या कामांना गती मिळत असून प्रत्यक्षात पाहिले असता ते काम देखील नियमानुसार नसल्याचे दिसून येते. नगररचना विभागात सध्या अर्धा डझन अधिकारी आणि कर्मचारी असून त्यांच्या संपर्कात मोजक्या खाजगी व्यक्तींचा वावर वाढला आहे. नव्याने पदभार घेतलेले अधिकारी देखील जुन्यांच्या तालमीत बसू लागल्याने फायलींची निपटारा दुप्पट वेगाने वाढला आहे. प्रशासक राज्यात आपल्या दमदार कामाने आपली छाप उमटविणाऱ्या मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव बाजूला सरताच त्यांची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील पकड देखील सैल झाल्याचे सध्या पहावयास मिळते. शहरातील विकासकामांची गुणवत्ता, स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडीवर गेलेले शहर, रखडलेली कामे याविषयी मात्र आयुक्त आणि इतर अधिकारी फारसा रस घेत नाही.

नगररचना विभागातील कामाविषयी कुणीच काही बोलत नसल्याने अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे फावले होत आहे. मनपात काही खाजगी व्यक्तींचा नेहमी वावर वाढला असून नगररचना विभागातील सूत्रे हलविण्यात गणेश कॉलनी, रिंगरोड स्थित एका ‘सेठ’ नामक शल्य विशारदचा हात असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या नियमबाह्य आणि अनधिकृत बांधकामाची संबंधित फायली इकडून तिकडे फिरविण्याचे आणि आर्थिक देवाण घेवाणचे काम सेठच्या माध्यमातून होत असल्याचे बोलले जात आहे. मनपात केवळ सेठच नाही तर काही इतर व्यक्ती देखील शासकीय फाईल इकडून तिकडे घेऊन जाताना दिसतात. मनपात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद होत असून लवकरच तो सचित्र जगासमोर देखील येईल हे निश्चित. मनपा आयुक्तांच्या दालनापासून जवळपास सर्वच आणि विशेषतः नगररचना विभाग अशी भटकंती काही व्यक्ती नेहमी करतात.

जळगावातील काही माहिती अधिकार कार्यकर्ते नगररचना विभागाच्या सर्व कामांची पोलखोल करण्याच्या तयारीत असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते बॉम्ब फोडतील असा अंदाज आहे. काही महिन्यांपूर्वी जळगावातील तत्कालीन आणि वादग्रस्त जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा देखील निकटवर्तीय असल्याचे सांगत या ‘सेठ’ने काही प्रकरणांचे पैसे घेतले होते, मात्र ऐनवेळी मित्तल यांची बदली झाल्याने सर्व नियोजन कोलमडले. ऑनलाईनच्या जमान्यात बिनधास्त वावर असलेल्या सेठ आणि खाजगी व्यक्तींच्या ये-जा करण्यावर मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड कसा प्रतिबंध घालणार हे पाहणे औत्सक्याचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button