जळगाव l ३१ जानेवारी २०२४ l जळगाव जिल्ह्यात यंदा मराठा प्रीमियर लीगच्या ७ व्या पर्वाला उद्या दि.१ फेब्रुवारीपासून सागर पार्क मैदानावर सुरुवात होणार आहे. मराठा स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेत ५०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती रोहित निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थापक अध्यक्ष स्व.हिरेशदादा निकम यांनी सुरू केलेल्या मराठा प्रीमियर लीगची माहिती देण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेला रोहित निकम, श्रीराम पाटील, मनोज पाटील, ऍड. गोपाल दर्जी, कुलभूषण पाटील, राम पवार यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
मराठा स्पोर्ट्स फाऊंडेशन संचलित मराठा प्रीमियर लीग स्पर्धेत यंदा ३६ पुरुष संघ, ६ महिला संघ असे एकूण ४२ संघ सहभागी होणार असून मुख्य प्रायोजक रोहित निकम हे आहेत. जिल्ह्यात गेल्या ६ वर्षापासून मराठा प्रीमियर लीग रंगत आहे. यंदा ७ वे पर्व असून मराठा प्रीमियर लीग सामाजिक पर्व जपत आहे. यंदा माजी सैनिक, सर्व शासकीय अधिकारी यांचा मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. तसेच सर्व समाजाच्या क्रिकेट स्पर्धा आयोजकांचे एकत्र संमेलन, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, सुरक्षीत वाहतूक सप्ताह जनजागृती केली जाणार आहे.
स्पर्धेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. दि.२ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे भेट देणार आहेत. तसेच दि.४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योजक ॲप लॉन्च करण्यात येणार आहे.
आयोजक म्हणाले की, एमपीएल एक सामाजिक बांधिलकी तर आहे पण सर्वांना एकत्र करीत जिल्ह्याचा जीडीपी वाढविण्यासाठी उद्योजक ॲप लॉन्च करणार आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचा देखील मानस असल्याचे आयोजक म्हणाले. तसेच एमपीएल आणि एलपीएल यांनी मोहाडी येथील रुग्णालयात कोविड काळात अन्न पुरविण्याचे आणि रुग्णांची सेवा करण्याचे कार्य केले होते. यंदा चोपडा आणि भुसावळ येथे देखील एमपीएलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.