शेळीला वाचवताना सांडपाण्याच्या खड्ड्यात गुदमरून तरुणाचा मृत्यू

शेळीला वाचवताना सांडपाण्याच्या खड्ड्यात गुदमरून तरुणाचा मृत्यू
यावल तालुक्यातील कोरपावली येथे हृदयद्रावक घटना
यावल (प्रतिनिधी) :कोरपावली गावातील १८ वर्षीय तरुणाचा सांडपाण्याच्या खड्ड्यात गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि. ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. एक शेळी सांडपाण्याच्या खड्ड्यात पडल्याने ती वाचविण्याच्या प्रयत्नात हा तरुणही खड्ड्यात उतरला. मात्र चिखलात रुतून त्याचा श्वास गुदमरल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मृत तरुणाचे नाव जयेश संतोष महाजन (वय १८, रा. कोरपावली, ता. यावल) असे असून तो मेंढ्या-शेळ्या चारून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश महाजन हा आपल्या मेंढ्या-शेळ्या चारून संध्याकाळी गावाकडे परतत असताना, गावाबाहेरील सांडपाण्याच्या खड्ड्यात एक शेळी पडली. जयेशने तिला वाचवण्यासाठी स्वतःही त्या खड्ड्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिखल खोल व सरकणारा असल्याने त्याचा तोल गेला आणि तो त्यात खोलवर रुतत गेला. श्वास कोंडल्यामुळे काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जयेशला चिखलातून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृउबा सभापती राकेश हेगडे, सरपंच विलास अडकमोल, उमेश जावळे व इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जयेशला मृत घोषित केले.
या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. अत्यंत मेहनती व कष्टकरी कुटुंबातील तरुणाच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे कोरपावली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.