
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन वर्षीय चिमुकली ठार
डांभुर्णी शिवारातील घटनेमुळे परिसरात खळबळ
यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावाला हादरवून सोडले आहे. अवघ्या दोन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर बिबट्याने हल्ला करत तिला क्रूरपणे ठार केले. रात्रीच्या नीरव शांततेत घडलेल्या या भीषण घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
प्रभाकर चौधरी यांच्या शेतात ठेलारी समाजातील एक मेंढपाळ कुटुंब राहत होते. रात्री सुमारे १ वाजता, दोन वर्षाची बालिका रत्नाबाई ही तिची आई जिजाबाईंच्या सोबत झोपलेली असताना , बिबट्याने चोरपावलांनी येऊन झोपलेल्या चिमुकलीला अलगद उचलून नेले. काही क्षणांतच तिच्या लहानशा शरीराचे लचके तोडून बिबट्याने तिला मृत्यूच्या दाढेत ओढले. सकाळी तिचा मृतदेह शिवारातील झाडाझुडपांमध्ये आढळला. ही दृश्ये पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, तर हृदय पिळवटून निघाले.
या घटनेची माहिती मिळताच यावलचे तहसीलदार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तपासाला सुरुवात झाली असली, तरी बिबट्याचा बंदोबस्त न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे.रात्री एकच्या सुमारास वन अधिकारी विपुल पाटील, पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे व अन्य सहकाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले. डांभुर्णी येथील पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनंतर यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व त्यांचे सहकारी देखील रात्रीच येथे दाखल झाले.
यापूर्वीही या बिबट्याने परिसरात हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, वनविभागाच्या निष्क्रियतेचा फटका आता चिमुकलीच्या जीवाला बसला आहे.सध्या रब्बी हंगामातील शेतीची कामे जोरात सुरू आहेत. शेतकरी आणि मजूर मोठ्या संख्येने शेतात कामाला जात आहेत. परंतु, या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. अनेकांनी शेतात जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे. “रात्री शेतात थांबणे आता जीवावर बेतू शकते,” अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.