
मोठी बातमी : भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी
भारताच्या अटी शर्तींवर झाला ऐतिहासिक करार
नवी दिल्ली, १० मे २०२५: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीला पूर्णविराम देत दोन्ही देशांनी पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी ५ वाजेपासून हा युद्धविराम लागू झाला असून, याबाबतची अधिकृत माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा निर्णय दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील महत्त्वपूर्ण चर्चेनंतर घेण्यात आला आहे.डीजीएमओ स्तरावरील चर्चापरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, आज दुपारी ३:३५ वाजता पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांनी भारताच्या डीजेएमओशी दूरध फोनवरून संपर्क साधला. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी गोळीबार, जमिनीवरील लष्करी कारवाया, हवाई हल्ले आणि समुद्री कारवाया भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ५ वाजेपासून थांबवण्याबाबत एकमत झाले. युद्धविरामाच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही बाजूंना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. युद्धविरामाची प्रभावी अंमलबजावणी आणि पुढील कृती ठरविण्यासाठी दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील.मिस्री म्हणाले, “हा युद्धविराम दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही या कराराचे पालन करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”तणावाची पार्श्वभूमीहा युद्धविराम जम्मू आणि काश्मीरमधील २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर झाला आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले होते. भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर (एलओसी) वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतातील अनेक ठिकाणी हल्ल्यांचे प्रयत्न केले, ज्याला भारतीय लष्कराने प्रत्येक वेळी सडेतोड प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील युद्धविरामाचा निर्णय हा शांततेसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.