विद्यापीठाला क्विक हेल फाउंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षाचे चार पुरस्कार प्राप्त
जळगाव दि.१४(प्रतिनिधी)-क्विक हेल फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या सायबर सुरक्षा पुरस्कारात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुण्यात झालेल्या एका समारंभात या पुरस्कारांचे वितरण झाले.
क्विक हेल फाउंडेशन आणि विद्यापीठातील संगणक शास्त्र प्रशाळा यांच्यात सामंजस्य करार झाला असून या करारान्वये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रशाळेच्या ३८ विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेच्या बाबतीत जनजागृती केली. जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जवळपास १०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन ४० हजार विद्यार्थ्यांमध्ये आणि दहा हजार सामान्य नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेचे प्रबोधन करण्यात आले.
सायबर सुरक्षेचे प्रबोधन करण्यात आल्याबद्दल सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवार्ड २०२४ चे आयोजन १० फेब्रुवारी रोजी पुणे येथे करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेला विविध पुरस्कार देण्यात आले.
कुणीका खैरनार आणि दर्शना हिरे या विद्यार्थिनींना बेस्ट प्रोसेस कॉम्प्लिअन्स हा अवॉर्ड देण्यात आला तसेच गायत्री ठाकरे आणि श्रेया भोंबे या विद्यार्थिनींना बेस्ट प्रोग्राम आऊटरिच इम्पॅक्ट हा अवॉर्ड देण्यात आला.प्रशाळेतील प्रा. राजू आमले, प्रा. सुरेंद्र कापसे व प्रा.मनोज पाटील यांना बेस्ट प्रोसेस कॉम्पियन्स हा अवॉर्ड देण्यात आला. संगणकशास्त्र प्रशाला आणि विद्यापीठाला बेस्ट मीडिया अँड आऊटरिच हा अवॉर्ड देण्यात आला या कार्यक्रमास कुलगुरू प्रा.व्ही एल माहेश्वरी तसेच क्विक हेलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा काटकर,सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवार, सायबर सेलचे पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे आदी उपस्थित होते.