खान्देशजळगांव

‘सेठ’ने केलेल्या बांधकामांची होणार पाहणी : डिगेश तायडे

खान्देश टाइम्स न्यूज | २२ फेब्रुवारी २०२४ | जळगाव मनपातील नगररचना विभागात एका सेठ नामक व्यक्तीचा हस्तक्षेप असल्याची चर्चा होती. खान्देश टाइम्स न्यूजने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपात अनेक हालचाली घडल्या. दरम्यान, वास्तू विशारद सेठने जळगावात अनेक इमारतींच्या बांधकामाचे डिझाईन केले असून ते नियमानुसार नसल्याची चर्चा आहे. जिल्हापेठ परिसरात असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे नगररचना सहाय्यक संचालक डिगेश तायडे यांनी सांगितले.

जळगाव मनपातील नगररचना विभाग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो परंतु गेल्या सहा महिन्यांपासून नगररचना विभाग जास्तच गाजत आहे. नगररचना विभागात सहायक नगररचना संचालक या पदावर तायडे यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याकडे मनपाचा अतिरिक्त कार्यभार आहे. नगररचना विभागात येणाऱ्या इमारत बांधकाम संदर्भातील सर्व फाईल कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत येतात आणि त्यानंतर तायडे यांनी टिपणी केल्यावर त्या मनपा आयुक्तांकडे जात असतात.

मनपातील नगररचना विभागात सुरू असलेल्या कामात काही बाहेरील लोक देखील हस्तक्षेप करीत असल्याचे समोर आले होते. काही दिवसापूर्वीच मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत टॉवर चौक ते नेहरू चौक दरम्यान असलेल्या ५ इमारतींना सील लावले होते. मनपाच्या कारवाईनंतर काही इमारत मालकांनी पार्किंगसाठी रॅम्प तयार केल्याने त्यांचे सील उघडण्यात आले होते. तर एका इमारतीचे सील काहीही बदल न करता उघडण्यात आले. शीतल कलेक्शन प्रकरणात वास्तू विशारद यश सेठ यांनी आपला खुलासा सादर केला होता. इमारतीचे पूर्ण काम मी पाहिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सेठ यांच्या खुलाशामुळे मनपा प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.

दरम्यान, यश सेठ यांनी जळगावात अनेक इमारतीचे बांधकाम डिझाईन केले आहे. काही इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देखील मिळाला आहे. जिल्हापेठ परिसरात असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाबाबत डिगेश तायडे यांना विचारणा केली असता त्याची पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी तात्काळ त्या परिसरातील अभियंता यांना दिल्या आहेत. तसेच आदर्श नगर, रिंगरोड, मुख्य शहरात असलेल्या काही इमारतींच्या बांधकामांची देखील तक्रार एक माहिती अधिकार कार्यकर्ते करणार असून त्यानंतर त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

मनपात नगररचना विभागात होत असलेल्या कामाच्या बाबतीत अनेक तक्रारी आहेत. कोणत्याही कामाची पाहणी करणे आणि फाईल तपासणे हे संबंधित परिसरातील जबाबदार अभियंता आणि मनपातील कनिष्ठ अधिकारी यांचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यात काही दोषी आढळले तर ते त्याला जबाबदार ठरू शकतात. सध्या मनपाचा नगररचना विभागात शेख, जयंत शिरसाठ, विजय मराठे हे कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button