
फटाका फॅक्टरी लागलेल्या आगीत 21 जणांच्या मृत्यू प्रकरणी शिरोळे दाम्पत्यांसह तिघांना दहा वर्षांचा कारावास
अमळनेर न्यायालयाचा निर्णय
अमळनेर (प्रतिनिधी) : पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स फॅक्टरीत २००९ साली झालेल्या भीषण आगीत २१ जणांचा बळी गेला होता. तब्बल १६ वर्षांनंतर या प्रकरणात तिघा मालकांना अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
ही दुर्घटना १० एप्रिल २००९ रोजी पारोळा येथे घडली होती. स्फोटक पदार्थांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीत आगीचे भडके उठले आणि काही क्षणांतच ती पूर्ण परिसरात पसरली. यात २१ जणांचा मृत्यू झाला व ३९ जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे आणि मनीषा चंद्रकांत शिरोळे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान उघड झाले की, कारखान्याचा परवाना कालबाह्य झाला होता, कामगारांना सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले नव्हते, तसेच बालकामगार कायद्याचेही उल्लंघन झाले होते. यामुळे मृत्यू व जखमी होण्याचे प्रमाण अधिक वाढले.
या प्रकरणाचा खटला अमळनेर सत्र न्यायालयात चालला. ४२ साक्षीदार तपासण्यात आले; मात्र ३८ साक्षीदार फितूर झाले. तरीही न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी काही महत्वाच्या सरकारी साक्षीदारांच्या जबानीवर विश्वास ठेवत तिघा मालकांना दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपींना भादंवि कलम ३०४(२) अंतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी, तर स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत दोन वर्षे सक्तमजुरी आणि अनुक्रमे १० हजार व २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागणार आहेत. उर्वरित पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून एका आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.
सरकार पक्षातर्फे या खटल्यात प्रारंभी अॅड. मयूर अफूवाले आणि नंतर अॅड. राजेंद्र चौधरी यांनी बाजू मांडली.