खान्देश टाइम्स न्यूज | ७ जुलै २०२३ | जळगाव जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही हे सध्या सतत गैरहजर आहेत. अधिकारी नसल्याने सर्व कारभार रामभरोसे सुरू आहे. नागरिक व वाहन चालकांचे मोठे हाल होत असल्याची तक्रार शिवसेना जिल्हा शिव वाहतूक सेनेचे माजी अध्यक्ष सुलतान बेग नजीर मिर्झा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मिर्झा यांनी दिलेले निवेदन पुढीलप्रमाणे, जळगाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. श्याम शिवाजीराव लोही कार्यालयात सोमवारपासून सतत गैरहजर असून त्यामुळे जळगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुणीही सक्षम अधिकारी हजर नसल्याने जळगाव कार्यालयातील वाहन धारकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच त्यांचा कार्यभार ज्या अधिकाऱ्याकडे सोपविलेला आहे तो अधिकारी देखील कार्यालयात येत नसल्याने सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. सध्या अपघाताचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू असून व जिल्ह्यात प्रचंड अवैध वाहतूक बोकाळलेली असून त्यावर नियंत्रक असा कोणताही सक्षम अधिकारी नाही. त्यामुळे जिल्हा हा मोठ्या प्राणहानीस जाण्याची भिती आहे. त्यामुळे श्री. श्याम शिवाजीराव लोही यांना तात्काळ कार्यालयात हजर होण्याचे आदेश व्हावेत व त्यांच्या बेजबाबदारपणावर प्रशासनाने उचित कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.
तसेच जळगाव जिल्ह्यातील वायुवेग पथकाने वापरलेल्या इंधनांची बील अदा केलेले नाही. त्यामुळे इंधन पुरवठा दराने इंधनाचा पुरवठा थांबवलेला आहे. तरी देखील वायुवेग पथकाची वाहने हे सर्वसामान्य वाहनधारकांची लूट करून खाजगी पैशातून वाहनात इंधन भरत आहे व हा भ्रष्टाचार खुलेआमपणे सुरू आहे. त्या भ्रष्टाचाराची देखील तातडीने चौकशी व्हावी. तसेच याबाबत जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारणा व्हावी व जिल्ह्याचे प्रमुख श्री. श्याम लोही हे ह्या भ्रष्टाचाराचे प्रमुख सूत्रधार असल्याने त्यांची चौकशी होवून त्यांच्या मालमत्तेची पोलीस चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी, ही विनंती.
तसेच मागील महिन्यात महाराष्ट्र-मध्यप्रदेश या चोर रस्त्यावर विशेष तपासणी पथकाने लाचेची मागणी केल्याचा व्हीडीओ हा संबंधीत पत्रकारांकडे प्राप्त झालेला होता. तसेच दिनांक ०५/०७/२०२३ रोजी दैनिक बातमीदारमध्ये ” आरटीओ पथकाची अवैध वसुली, महिला पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी !” अशी बातमी प्रसिद्धीस आलेली आहे. त्या पथकात श्री. श्याम लोही यांना देणे करीता पैसे जमा करावे लागतात असा स्पष्ट उल्लेख होता. तथापि, पैसे देवून हे प्रकरण दडपण्यात आले व संबंधीत वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न होता केवळ त्यांना कार्यालयात बोलविण्यात आले. मात्र प्रसिद्ध माध्यमात अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचे भासविण्यात आले.
ह्या प्रकरणात जनतेचा स्मृती पटलाआड जात नाही तोच पुन्हा तेच पथक पाल येथे पाल मार्गे जाणाऱ्या मध्यप्रदेशातील रस्त्यावर श्री. श्याम लोही यांच्या करीता भ्रष्टाचाराचे पैसे जमा करीत आहे. त्या प्रकरणात देखील श्री. श्याम लोही यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत होणे क्रमप्राप्त आहे. तसेच या वाहनातील इंधनाचा खर्च देखील अपहाराच्या रकमेतून भरला जात असल्याने त्यास श्री. श्याम लोही हेच जबाबदार आहेत. त्यामुळे वरील तिनही प्रकरणांची चौकशी होवून श्री.श्याम लोही यांची विभागीय चौकशी देखील व्हावी. ह्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात व या पूर्वी देखील अनेक तक्रारी व न्यायालयीन प्रकरणात श्री. श्याम लोही यांच्या चौकश्या परिवहन विभाग हप्ते खावून करीत असल्याने सर्व बाब साट्यालोट्याने सुरू आहे.
शासनाच्या नियमानुसार व कायद्यानुसार अशा चौकश्या पूर्णतः निकाली निघेपावेतो कोणताही शासकीय अधिकाऱ्यास अथवा कर्मचाऱ्यास पदोन्नती देत येत नाही. तरी देखील परिवहन विभागाची वरीष्ठ अधिकारी ह्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अपहाराची रक्कम स्वीकारून श्री. श्याम लोही यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात खूप मोठा अपहार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीस माझा आक्षेप आहे. त्यांना पदोन्नती दिल्यास पदोन्नती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची खुली चौकशी करणेकामी तात्काळ मा.ना.उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, याची गांभीर्याने देखील सर्व शासकीय यंत्रणेने घ्यावी, अशी मागणी वजा तक्रार सुलतान बेग नजीर मिर्झा यांनी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.