जळगाव : ग्रामपंचायत सदस्याविषयी असलेल्या तीन अपत्याच्या तक्रारीसंदर्भात सकारात्मक अहवाल देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली. शनिवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील लिपीक महेश रमेशराव वानखेडे (वय ३०, मूळ रा. नेर, जि. यवतमाळ) व समाधान लोटन पवार (वय ३५, रा. पारोळा) यांना लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ माजून गेली आहे.
जळगाव तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत २०२१ मध्ये तक्रारदार हे निवडणुकीत निवडून आले आहे. त्यांच्याविरुद्ध तीन अपत्य असल्यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील लिपिक महेश वानखेडे यांच्याकडे पेंडींग होते. त्यानंतर तक्रारदार हे त्यांना भेटले असता, तक्रारदाराला सांगितले की, तुमचा तीन अपत्यबाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करुन देतो, त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो. असे सांगून त्यांच्याकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, तक्रारदाराने शनिवारदि. ९ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता.
लाच घेण्यसाठी आले कार्यालयात शासकीय कार्यालयांना शनिवारी सुट्टी असते, दरम्यान ग्रामपंचायत विभागातील दोघे लिपीक हे लाच घेण्यासाठी आपल्या कार्यालयात आले होते. दरम्यान, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून समाधान पवार यास ३० हजारांपैकी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक बाळूमराठे, अमोल सूर्यवंशी, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली.