
‘स्पीड पेट्रोल’च्या वादातून ग्राहकावरच हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी | जळगाव
मेहरुण परिसरातील पेट्रोल पंपावर ‘स्पीड पेट्रोल’ उपलब्ध नसल्याच्या कारणावरून एका ग्राहकाला पंपाचा मालक समजून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे घडला. या घटनेत चार जणांनी मिळून ग्राहकास शिवीगाळ करत मारहाण केली असून, त्यापैकी एकाने लोखंडी कड्याने कपाळावर घाव घालून जखमी केले. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय नामदेव ढेकळे (वय ५४, रा. आदर्शनगर, जळगाव) हे आपल्या चारचाकी वाहनात डिझेल भरण्यासाठी गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मेहरुणजवळील पेट्रोल पंपावर गेले होते. यावेळी दोन मोटारसायकलवरून आलेले शुभम सुनील शिंदे, शरद अशोक पाटील, कुणाल पाटील आणि शेखर (पूर्ण नाव अज्ञात) या चौघांनी त्यांच्यावर अचानक तावातावाने प्रश्न विचारत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
“तुमच्याकडे स्पीड पेट्रोल का नाही?” असा सवाल करीत त्यांनी ढेकळे यांना पंपाचा मालक समजून वाद घातला. काही क्षणांतच वाद विकोपास जाऊन त्यांनी ढेकळे यांना शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शरद पाटील याने हातातील लोखंडी कड्याने ढेकळे यांच्या कपाळावर घाव घालून त्यांना जखमी केले.
या प्रकरणी ढेकळे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून, चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.