२३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघड;मध्य प्रदेशातून दोघांना ठोकल्या बेड्या


२३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघड;मध्य प्रदेशातून दोघांना ठोकल्या बेड्या
कासोदा पोलिसांची कारवाई
जळगाव : कासोदा शिवारातील एका शेतातील पत्री शेडमधून ३ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी १८ लहान-मोठ्या शेळ्या आणि ५ लहान-मोठे बोकड असा एकूण २३ शेळ्या-बोकडांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याची उकल करत कासोदा पोलिसांनी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यात धडक कारवाई करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. अजय राजू चौव्हाण (रा. साईखेडी, ता. भगवानपुरा) आणि सोहन विश्राम ब्राम्हणे (रा. बडी, ता. भगवानपुरा) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून, चोरीसाठी वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व चाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी विशेष तपास पथक तयार केले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या पथकाने मध्य प्रदेशातील बडी गाव गाठून अजय चौव्हाण व सोहन ब्राम्हणे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून टोळीतील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई ग्रेड पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल किरण गाडीलोहार आणि पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




