
जळगावात शरद पवार गटाला हादरा ; जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश
मुंबई | प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात आज राजकीय खळबळ उडवणारी मोठी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जबर हादरा बसला असून, जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते, पाच माजी आमदार आणि शेकडो कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या भव्य आणि ऐतिहासिक समारंभात या प्रवेशाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होतीच; त्यात अंतर्गत मतभेद व गटबाजीने जोर धरल्याने, नेतृत्व बदलण्याची चर्चा उफाळून आली होती. अखेर या चर्चांना आज पूर्णविराम मिळत, जिल्ह्यातील राजकारणाची दिशा अजित पवार गटाच्या बाजूने झुकली.
मुंबईतील कार्यक्रमात माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास गोरख पाटील, दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, अमळनेर बाजार समितीच्या माजी सभापती तिलोत्तमा पाटील तसेच शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या नेत्यांचे औपचारिक स्वागत करत, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात जोरदार घोषणा आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
या प्रवेश सोहळ्यास आ. अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मंचावरून घोषणांचा गजर होत असताना अनेकांनी “आता खरा बदल होणार” असा विश्वास व्यक्त केला.
या राजकीय भूकंपामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा फटका बसला आहे. आता जिल्ह्यात केवळ माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्वर जैन, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि काही निवडक नेते वगळता, बहुतेक सर्व प्रभावशाली नेते अजित पवार गटात दाखल झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच घडलेली ही घटना शरद पवार गटासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटाची ताकद जिल्ह्यात वाढत असून, आगामी राजकीय समीकरणं त्यांच्या बाजूने झुकण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.