पाचोरा ;- दोन जणांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सातगाव तांडा येथे घडली असून याप्रकरणी एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसानं ताब्यात घेतले आहे.
सातगाव तांडा येथील पोपट ओंकार राठोड आणि सातगाव (डोंगरी) येथील राहुल अभिमन अलाट यांच्यात काल १० रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान सातगाव बस स्टॉप येथे झालेल्या हाणामारीत पोपट राठोड (वय- २२) याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पाचोरा तालुक्यातील सातगाव (डोंगरी) गृप ग्रामपंचायत मध्ये सातगाव सह गहुले, तांडा या गावांचाही समावेश आहे. तांडा येथील नागरिकांचे दररोज सातगावात येणे जाणे असते. आठवड्याच्या बाजारलाही येत असतात. गेल्या दोन वर्षांपूर्वी पोपट राठोडचे काका आणि राहुल आलाट यांच्यात वादविवाद झालेले होते. त्या वादात पोपट राठोड काकाच्या वतीने मध्यस्थी करत होता. १० रोजी पोपट हा सातगावात संध्याकाळी सहाच्या दरम्यान बस स्टैंड वर उभा होता. यावेळी राहुल आलाट याने त्याला बघितले आणि दोघांची बाचाबाची झाली. यात पोपटच्या डोक्याला मार लागल्याने तो तसाच मोटरसायकलवर तांड्यात निघाला. मात्र रस्त्यातच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने गाडी उभी करुन जमीनवर झोपला आणि त्यातच तो गतप्राण झाला.
संशयीत आरोपी म्हणून राहुल आलाट यास पोलिसांनी ताब्यात घेतले . . अंत्यविधी झाल्यानंतर तांडा येथील बरेच नागरिक पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, बीट हवालदार आर. के. पाटील, किरण ब्राह्मणे यांच्याकडे असून यावेळी पोलीस रणजीत पाटील, जितेंद्र पाटील, संदीप राजपूत, आणि दोन होमगार्ड आदींनी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनेवर लक्ष ठेवून होते. तांड्यात ११ रोजी एकाचीही चूल पेटली नाही. मयत पोपट राठोड याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, काका असा परिवार आहे.