
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; जळगावात भाव ९३,८०० रुपयांवर
जळगाव (प्रतिनिधी) – अमेरिकेतील टॅरिफ स्थगनाच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा बदल पाहायला मिळत असून, त्याचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजारावर झाला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचे दर सलग चौथ्या दिवशी वाढले असून, ते आता विनाजीएसटी ९३,८०० रुपयांवर पोहोचले आहेत.
शनिवारी (१२ एप्रिल) सोन्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह दर ९६,६१४ रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. हा दर आजवरचा सर्वोच्च उच्चांक मानला जात आहे.
चांदीही मागे नाही, थेट २,३०० रुपयांची उसळी
सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही प्रचंड झपाट्याने वाढ झाली आहे. शनिवारी २,३०० रुपयांची उसळी येत चांदीचा दर विनाजीएसटी ९५,८०० रुपये प्रति किलोवर पोहोचला.
१० आणि ११ एप्रिल रोजी सलग दोन दिवस सोन्यात प्रत्येकी १,९०० रुपयांची वाढ झाली होती. त्या वाढीनंतर सोन्याचा दर ९३,२०० रुपयांवर पोहोचला होता. त्यावर शनिवारी पुन्हा वाढ होऊन तो ९३,८०० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा दर ११ एप्रिल रोजी ९३,५०० रुपये प्रति किलोवर स्थिर होता, जो आता थेट ९५,८०० रुपयांवर गेला आहे.
गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता, खरेदी वाढण्याची शक्यता
भाववाढीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली असून, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर लवकरच सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे.