
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वीजकामगाराचा बळी?
मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे रुईखेडा येथे वीज पोलवर दुरुस्तीचे काम करीत असतांना अचानक वीजपुरवठा सुरु झाल्याने 22 वर्षीय कंत्राटी वीज कामगाराचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना दि 11 रोजी रुईखेडा येथे घडली.
तालुक्यातील मौजे टाकळी येथील नितेश अशोक पाखरे (वय-२२) असे मृत्यु झालेल्या वीज कामगाराचे नाव असून आयटीआय शिक्षण घेऊन गत दिड-दोन महिन्यांपासुन नितेश पाखरे अग्रवाल कंपनीच्या ठेकेदाराच्या माध्यमातून महावितरण विज कामगार म्हणुन काम करीत होता दरम्यान आज रवीवारी दि 11 रोजी रुईखेडा येथे विद्युत पोल वर चढुन काम करीत असतांना अचानक वीजपुरवठा सुरु झाला आणी क्षणार्धात नितेश यांस जोरदार धक्का लागुन खाली कोसळुन गतप्राण झाला.
तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने तालुक्यात शोककळा पसरली असुन या घटनेनंतर महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हि दुर्देवी घटना घडली असल्याचा आरोप करुत उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान या घटनेबाबत पोलीसांकडुन तपास सुरु असल्याचे समजते.
मृत नितेश हा आई-वडील व मोठ्या भावासह टाकळी येथील वास्तव्यास होता.नितेशच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.