जळगावः जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या किरण अनिल बाविस्कर (वय २४, रा. गेंदालाल मिल) हा चॉपर घेऊन दहशत माजवित होता. शहर पोलिसांच्या पथकाने सोमवार दि. १८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगार किरण बाविस्कर याला उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी २ वर्षांसाठी जिल्हा हद्दपार केले आहे. दरम्यान जिल्हातून हद्दपार असताना देखील तो शहरात येऊन हातात लोखंडी चॉपर घेवून दहशत माजवित असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवार दि. १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास गेंदालाल मिल परिसरात कारवाई करत संशयित आरोपी किरण अनिल बाविस्कर याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे, पोलीस नाईक योगेश पाटील, रतन गीते यांच्या पथकाने केली आहे