
गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा; महिला पथकाची कारवाई, ट्रॅक्टर जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आव्हाणी शिवारातील गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या महिला पथकाने रविवारी दुपारी कारवाई केली. संबंधित ट्रॅक्टर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आला आहे.
गिरणा नदीपात्रातून परवानगीविना वाळू उपसली जात असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच महिला अधिकाऱ्यांचे विशेष पथक रविवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. या पथकात कानळदा मंडळ अधिकारी छाया कोळी, शिरसोली मंडळ अधिकारी सारिका दुरगुडे, चिंचोली तलाठी प्रतीक्षा नवले, धानवड तलाठी प्रिया डोंगरे तसेच तालुका पोलीस ठाण्यातील पोहेकॉ. ज्ञानेश्वर कोळी यांचा समावेश होता.
पथकाने आव्हाणी शिवारातील नदीपात्रात छापा टाकून विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले, ज्यातून वाळूचा उपसा सुरू होता. संबंधित ट्रॅक्टरवर तत्काळ कारवाई करत ते जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू उपसाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.