
मोटारसायकल चोरांचा २४ तासांत पर्दाफाश
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव | प्रतिनिधी एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. सिंधी कॉलनी परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलींसह एकूण १.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तक्रारदार यश मनोहरलाल अहुजा (२४, रा. केमिस्ट भवन, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजता त्यांनी आपली सीबी झेड मोटारसायकल (क्र. MH-19-BA-1737) सिंधी कॉलनी येथील सेवामंडळ मंदिरासमोर लावली. परंतु, ९ वाजता परत येताना त्यांना गाडी गायब असल्याचे आढळले. शोध घेऊनही गाडी न सापडल्याने त्यांनी ३१ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध
गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. यात दोन संशयित व्यक्ती मोटारसायकल काढताना दिसून आले. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता शनीपेठ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संजय मराठे हा चोरीत सामील असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला राहत्या घरातून अटक केली. चौकशीत त्याच्या साथीदाराचे नाव माधव श्रावण बोराडे असल्याचे उघड झाले.
आरोपींना अटक करून त्यांच्याकडून खालील चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या . यात मोटारसायकल सीबी झेड (MH-19-BA-1737८० हजार रुपये किमतीची हीरो एचएफ डिलक्स (MH-19-BT-6945) ६० हजार असा एकूण १ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, दोन्ही आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, किरण पाटील, नाना तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकूर यांनी सहभाग घेतला