खान्देश टाइम्स न्यूज l १७ एप्रिल २०२४ l रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने माजी आ.संतोष चौधरी नाराज आहेत. चौधरी यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. चौधरींच्या भूमिकेनंतर महाआघाडीतील घटकपक्ष शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट मध्यस्थी करणार आहे. शिवसेना आणि संतोष चौधरी यांचे जुने संबंध लक्षात घेता ही समजूत काढली जाणार आहे.
भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांचे नाव रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून जवळपास निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी भाजपतील आयात उमेदवार श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. नाराज संतोष चौधरी यांनी भुसावळ शहरात निर्धार मेळावा घेत कार्यकर्त्यांशी चर्चा करून दि.२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांना सांगून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे चौधरी यांनी सांगताना शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची देखील त्यांनी आठवण काढली.
स्व.बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ आठवण :
भुसावळ येथे शिवसेना उमेदवाराच्या प्रचार सभेला आले असता तिथेच स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची उमेदवारी रद्द करून दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे, अशी आठवण संतोष चौधरी यांनी करून दिली. तसेच सध्या शरद पवार यांच्याकडून तीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. संतोष चौधरी सध्या दिल्ली आणि मुंबई येथे जाणार असून त्यानंतर भुसावळ शहरात येणार आहे.
शिवसेनेशी चौधरी बंधूंचे जुने नाते :
माजी आ.संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. शिवसेना आणि चौधरी बंधूंचे जुने नाते आहे. आजही स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. शिवसेनेशी असलेले संबंध लक्षात घेता त्यांचे जुने मित्र पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे त्यांची समजूत काढणार आहे. श्रीराम पाटील यांना उमेदवारी का देण्यात आली, कोण – कोण स्पर्धेत होते, कोण कुठे मागे पडले हे सांगून संजय सावंत हे चौधरी बंधूंचे बंड शमविण्याचा प्रयत्न करणार आहेत.