खान्देशगुन्हेजळगांव

बसचे टायर फुटल्याने भीषण अपघात ; महिला चाकाखाली येऊन जागीच ठार

बसचे टायर फुटल्याने भीषण अपघात ; महिला चाकाखाली येऊन जागीच ठार

नशिराबाद टोल नाक्याजवळ घडली दुर्घटना; परिसरात खळबळ

नशिराबाद (प्रतिनिधी) : आज मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नशिराबाद टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात बसमधील प्रवासी महिला जागीच ठार झाली. भरधाव बसचे टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडला असून मृत महिला बसमधून बाहेर फेकली गेल्याने चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

मृत महिलेचे नाव साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसे, ता. यावल) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर आगाराची बस (एम.एच.१४ बी.टी.२३०६) ही जळगावकडून भुसावळकडे जात असताना नशिराबाद टोल नाक्याजवळ बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर फुटले. नियंत्रण सुटल्याने बस थेट टोल नाक्याजवळील भिंतीवर जाऊन आदळली.

या दुर्घटनेत प्रवासी साराबाई भोई या बसमधून बाहेर फेकल्या गेल्या व दुर्दैवाने बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या. त्यांच्या पश्चात पती आणि तीन मुलं असा परिवार आहे. समजते की त्या डोळ्यांची तपासणी करून जळगावहून परतत होत्या, मात्र परतीच्या प्रवासातच मृत्यूने त्यांना गाठले.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबाद परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button