
जळगाव पोलिसांची ‘इंटेलिजन्स’ बैठक; संवेदनशील गावांवर विशेष लक्ष
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना; दरमहा ‘एसपी-टू-अंमलदार’ संवाद
जळगाव : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गोपनीय माहितीचे कामकाज पाहणाऱ्या अंमलदारांची विस्तृत बैठक पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. अंमलदारांचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्या कामात अधिक अचूकता आणणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. विशेषतः संवेदनशील गावे, जातीय तणावाची शक्यता आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. छत्रपती संभाजी महाराज जयंती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती, महाराणा प्रताप जयंती आणि ईद यांसारख्या सणांच्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय, जिल्ह्यातील गुन्हेगारी हालचाली, इराणी गँग्स, गांजा लागवड, गोवंश तस्करी, बेकायदेशीर पुतळे उभारणी, तडीपार गुन्हेगार, तसेच विविध यात्रा आणि पालख्यांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी अंमलदारांना अधिक सतर्क राहून अचूक आणि वेळेवर गुप्त माहिती मिळवण्याबाबत मार्गदर्शन केले.
इंटेलिजन्स’ नेटवर्क मजबूत करण्यावर भर
बैठकीत ‘ह्युमन इंटेलिजन्स’, ‘ओपन सोर्स इंटेलिजन्स’, ‘सायबर इंटेलिजन्स’, ‘कम्युनिटी इंटेलिजन्स’, तसेच ‘टेक्निकल’ आणि ‘फॉरेन्सिक इंटेलिजन्स’ यांसारख्या विविध माहिती संकलनाच्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे उघडकीस आणण्यावर विशेष भर देण्यात आला.
दरमहा थेट संवादाचा निर्णय
गोपनीय अंमलदार हे पोलीस यंत्रणेचा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आता दर महिन्याला ‘एसपी-टू-डायरेक्ट अंमलदार’ बैठक आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे अंमलदारांच्या कामाची थेट दखल घेतली जाईल आणि त्यांच्या कामगिरीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीमुळे अंमलदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी सण-उत्सवांच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.




