खान्देश टाइम्स न्यूज | ११ जुलै २०२३ | जळगाव जिल्ह्यातील नगर भूमापन कार्यालय नेहमीच काही ना काही विषयाने चर्चेत असते. राज्यात सध्या सत्तेचे राजकारण रंगले असताना सोमवारी मात्र नगर भूमापन कार्यालयात खुर्चीचे राजकारण रंगले होते. सुमारे तासभर सुरू असलेल्या गोंधळात नागरिकांचे मोठे हाल झाले. साहेबांनी वेळीच योग्य सूचना केल्याने नागरिकांची कामे मार्गी लागली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नगर भूमापन कार्यालय आहे. शहर आणि ग्रामीण परिसरातील शेकडो नागरिकांचे दररोज उतारा आणि नोंदीसाठी नगर भूमापन कार्यालयात येणे – जाणे असते. सध्या सातबारा उतारा नोंदी बऱ्याच ऑनलाईन झाल्या असल्या तरी योग्य पद्धतीने काम न केल्याने अजूनही कितीतरी उतारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात आलेले नाही.
काही नागरिकांनी अर्ज स्वीकृतीबाबत थेट नगर भूमापन अधिकारी श्री.पाटील यांच्याकडेच तक्रार केल्यानंतर त्यांनी एका दुसऱ्या महिला कर्मचारी याबाबत सूचना केली. साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या महिला कर्मचारी देखील आपला मोबाईल शोधू लागल्या. मोबाईल मिळाला तरी त्यांनी अर्ज स्वीकार न करता पुन्हा त्याच खुर्ची प्रकरणाकडे लक्ष देण्यास महत्त्व दिले. विशेष म्हणजे या सर्व चर्चा, राजकारण एका कॅबिनमध्ये रंगत असताना इतरत्र काही व्हीआयपी नागरिक बिनधास्त कार्यालयात वावरत होते.
काही नागरिकांनी पुन्हा नगर भूमापन अधिकारी श्री.पाटील यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी एन.एस.डहाळे यांना सूचना केल्या. डहाळे यांनी सर्व नागरिकांचे अर्ज नोंदवून घेत त्यांना पोच दिली. नगर भूमापन कार्यालय इतका महत्त्वाचा विभाग असून अधिकारी चांगले असताना देखील कर्मचारी नागरिकांनी सहकार्य करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांना व्यवस्थित माहिती देण्यासही कुणी तयार होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनाच याकडे लक्ष द्यावे लागेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.