
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे कृती कार्यक्रमात नाशिक विभागात प्रथम
जळगाव | १८ मे २०२५
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रम योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याने नाशिक विभागात पोलीस निरीक्षक संवर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या योजनेअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये कार्यालयीन शिस्त, स्वच्छता, तक्रार निवारण, तांत्रिक साधनांचा वापर आणि जनतेसाठी सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याने या कालावधीत पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी सेवा वेळेत पूर्ण करणे, जुन्या फाईल्सची निर्गती, मुद्देमाल निकाली काढणे, सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे आदी बाबींमध्ये उल्लेखनीय सुधारणा केल्या. याशिवाय, “एक सत्र विद्यार्थ्यांसाठी”, “एकता होळी”, तसेच अंतर्गत “सर्वोत्कृष्ट अंमलदार गौरव” असे सामाजिक व प्रोत्साहनात्मक उपक्रमही राबविण्यात आले.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की, “आमच्या पथकाने टीमवर्कच्या जोरावर दिलेल्या सूचनांनुसार काटेकोर अंमलबजावणी केली. सततची प्रगती व सुधारणा हेच आमचे उद्दिष्ट राहिले. त्यामुळेच हा सन्मान मिळाला.”
या योजनेत दुसरा क्रमांक कोतवाली पोलीस स्टेशन (अहिल्यानगर, ) आणि तिसरा क्रमांक पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन (धुळे) यांना मिळाला आहे.
हा पुरस्कार केवळ सन्मान नसून, पोलीस व नागरिकांमधील विश्वास वाढवणारा सकारात्मक टप्पा ठरत असल्याचे प्रतिक्रिया जिल्हा पोलीस विभागातून व्यक्त होत आहे.