
खंडणी आणि ड्रग्स प्रकरणाची विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केली अधिकारी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी!
जळगाव : खंडणी, ड्रग्ज आणि गैरवर्तणुकीच्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हा पोलिस दलाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी (२१ मे) कठोर शब्दांत सुनावले. जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “चौकशी सुरू असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही; दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.”
या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर तसेच सर्व विभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते. कराळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमधील प्रलंबित आणि गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेतला. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचना दिल्या.
विशेषतः खंडणी व ड्रग्ज प्रकरणांबाबत बोलताना, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करत स्पष्ट केले की, अशा प्रकरणात कोणतीही दुर्लक्ष वा सौम्यता खपवून घेतली जाणार नाही. चौकशीनंतर दोषी ठरलेल्यांवर कठोर शिक्षा केली जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, गावठी कट्ट्यांच्या विरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेचाही त्यांनी आढावा घेतला. मध्य प्रदेश सीमेजवळील जंगल भागात सुरु असलेल्या अवैध शस्त्रनिर्मितीविरोधात जळगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी विशेष कौतुक केले. “या मोहिमेमुळे अनेक बेकायदा शस्त्रे जप्त करण्यात आली असून, ही कारवाई सातत्याने सुरू राहील,” असे कराळे यांनी स्पष्ट केले.