खान्देश टाइम्स न्यूज | २२ मे २०२४ | जळगाव शहरातील कालिंका माता चौकाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय तरुणाची जुन्या वादातून हत्त्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. किशोर अशोक सोनवणे रा.कोळीपेठ असे मयताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कोळीपेठ परिसरात राहणारा किशोर अशोक सोनवणे हा तरुण मक्तेदारीचा आणि इतर व्यवसाय उद्योग करीत होता. बुधवारी सायंकाळी कालिंका माता मंदिर चौकाजवळ असलेल्या एका चायनीज विक्रेत्यासोबत वाद झाला होता. काही वेळानंतर तो जवळच असलेल्या हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला होता.
रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये आलेल्या काही तरुणांनी जुना वाद उकरून काढत किशोरवर हल्ला चढवला. धारदार शस्त्र आणि लाकडी दांड्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी गर्दी करीत एकच आक्रोश केला.
मयत किशोर सोनवणे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष :
जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ढाबे आणि हॉटेलमध्ये विनापरवाना मद्य सेवन आणि विक्री केली जाते. रात्री १० वाजेनंतर देखील बऱ्याच हॉटेलमध्ये हे प्रकार बिनधास्त सुरु असतात. जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे कानाडोळा करीत असल्यानेच अवैध प्रकार वाढू लागले आहेत. आज घडलेल्या घटनेत देखील योग्य वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असती तर अनुचित प्रकार रोखता आला असता. पुण्यात जसे अनधिकृत बार आणि पब सुरु आहेत तसेच जळगावात देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशिर्वादाने ढाबे आणि हॉटेल सुरु आहेत.