खान्देश टाइम्स न्यूज l जकी अहमद l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात उमेदवार बदलाचे वारे सुरू झाले असून नवीन आणि उच्चशिक्षित उमेदवार देण्याचे सुरु आहे. भाजपकडून ४ नावे पुढे येत असले तरी त्यात रोहित निकम यांचे नाव आघाडीवर आहे. मराठा समाजाचा उमेदवार आणि सहकारातील अनुभव लक्षात घेता रोहित निकम यांना संधी मिळू शकते.
नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर उमेदवार बदलाच्या चर्चा सुरू झाल्यावर जळगाव लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे रिपोर्ट कार्ड सकारात्मक नसल्याने त्यांचा पत्ता कट होणार असल्याचे म्हटले जात होते. तेव्हा माजी आ.स्मिता वाघ या पक्षाशी एकनिष्ठ असल्याने त्यांचे नाव पुढे आले. सोबतच माजी खा.ए.टी.नाना पाटील, उद्योजक अविनाश पाटील – जाधव आणि जळगावशी घट्ट नाळ जुळली असलेले निकम कुटुंबातील रोहित निकम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. उन्मेष पाटलांचा पत्ता कट झाला मात्र मराठा समाजातील चेहरा आणि स्त्री म्हणून स्मिता वाघ यांना संधी मिळाली.
स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाल्यावर देखील माजी खा.ए.टी.पाटील आणि रोहित निकम यांनी त्यांच्यासाठी काम केले. दोघांनी देखील नाराजी न दाखवत पक्षाच्या आदेशाचे पालन केले. लोकसभा निवडणुकीला घेतलेली मेहनत फळाला आली आणि स्मिता वाघ मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. स्मिता वाघांच्या विजयात बुथ नियोजन सांभाळणाऱ्या रोहित निकम यांचा मोठा वाटा आहे. लोकसभेत नव्हे मात्र विधानसभेत रोहित निकम यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर विधानसभा मतदार संघात उमेदवार बदलाचे वारे असून त्यात रोहित निकम यांचे नाव आघाडीवर आहे.
जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे संस्थापक माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू व विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांचे पुतणे असलेल्या रोहित निकम यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रीय पातळीवर मोठा संदेश देता येणार आहे. विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांचे राष्ट्रीय पातळीवरही मोठे नाव आहे शिवाय युवा कार्यकर्ता असलेल्या रोहित निकम यांचा दांडगा जनसंपर्कही आहे. सध्या राज्य महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून रोहित दिलीप निकम हे काम पाहत आहे.