
खान्देश टाइम्स न्यूज | १३ जुलै २०२३ | पाचोरा शहरातील गोविंद नगर भागात गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राहत्या घरानजीक असलेल्या विहिरीत उडी घेत एका १९ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केली असून विवाहितेस सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्यानेच विवाहितेने आत्महत्या केली असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हीस सासु सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचुन बोलत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते.
घरात वारंवार होणाऱ्या भांडणामुळे राहुल चव्हाण हा पत्नीसह दि.१० जुलै रोजी पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता. दरम्यान १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल हिने टोकाचे पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजल हीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हीस मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात काजल हिच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश करत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजल हिने आत्महत्या केल्याचे सांगितले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.