जळगाव मध्ये तरुणाने घेतला गळफास ; दोन महिन्यानंतर होणार होते लग्न!

जळगाव मध्ये तरुणाने घेतला गळफास ; दोन महिन्यानंतर होणार होते लग्न!
आत्महत्येचे कारण अस्पष्ट ; तांबापुरा परिसरात खळबळ
जळगाव प्रतिनिधी | शहर आणि जिल्ह्यात युवक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील तांबापुरा परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 9 जुलै रोजी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत युवकाचे नाव नवाज सादिक सय्यद (वय 24) असे असून, तो बिलाल चौक परिसरातील महादेव मंदिराजवळ आई-वडील आणि तीन भावांसह वास्तव्यास होता. त्यांचे या परिसरामध्ये दोन घरे असून तो दुसऱ्या घरी आठ जुलै च्या रात्री झोपायला गेला . आज सकाळच्या सुमारास वडील सादिक सय्यद यांनी त्याला उठवण्यासाठी दुसऱ्या घरी गेले असता, नवाजने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने नातेवाईक व शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी रुग्णालयात आणि परिसरात नातेवाईक व मित्रमंडळींचा आक्रोश पाहायला मिळाला.
विशेष म्हणजे, केवळ दोन महिन्यांनंतर नवाज याचे लग्न होणार होते. तो अत्यंत शांत, मनमिळावू आणि सहृदयी स्वभावाचा होता, असे त्याच्या परिचितांनी सांगितले. मात्र, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप अस्पष्ट आहे.
एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
