जळगाव महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाचा जिल्हा दौरा

जळगाव महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाचा जिल्हा दौरा
खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेत्यांचा दोन दिवसांचा दौरा; रणनीती ठरवण्यासाठी बैठका
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महापालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुन्हा सक्रिय झाली असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आता थेट जिल्हा दौऱ्याची रणनीती आखण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख नेते खासदार संजय राऊत शुक्रवार आणि शनिवार (३० मे आणि ३१ मे) रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर जळगाव जिल्ह्यात येत आहेत.
महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील अपयशानंतर जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. अनेक मातब्बर नेते महायुतीत सामील झाल्यामुळे विशेषतः ठाकरे गट व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर गळती झाली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि पुन्हा नव्याने संघटनात्मक पातळीवर सज्ज होणे, ही काळाची गरज बनली आहे.
ठाकरे गटाने या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि पक्षाला नव्याने उभारी देणे, हे या दौऱ्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. खासदार संजय राऊत यांच्यासोबत उपनेते संजय सावंत, आमदार मनोज जामसुतकर यांच्यासह अन्य नेते दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
३० मे, शुक्रवार: जळगाव शहर व परिसरातील निवडक पदाधिकाऱ्यांच्या भेटी, पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा.
३१मे, शनिवार: अजिंठा विश्रामगृह येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती निश्चित करण्यात येणार आहे.
या बैठकीत उमेदवारांच्या निवडीची प्राथमिक प्रक्रिया, प्रचाराचे नियोजन, स्थानिक मतदारांचा कल आणि आघाडीतील समन्वय यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.