खान्देश टाइम्स न्यूज । दि.१३ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी महायुती सरकारने यापूर्वी १०० कोटी रुपये दिले होते. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी आणखी १०० कोटी रुपयांची आवश्यकता असून त्यासाठी आ.राजुमामा भोळे हे शासन दरबारी मागणी करीत होते. आ.राजुमामा भोळे यांच्या मागणीला यश आले असून मंगळवारी जळगावात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मंगळवारी जळगावात करण्यात आला. सागर पार्क मैदानावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी महायुती सरकारच्या काळात १०० कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर निधीतून अनेक रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून इतर रस्त्यांसाठी आणखी १०० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. जळगाव शहराचे आ.राजुमामा भोळे हे निधीसाठी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत होते.
मंगळवारी जळगावात महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आलेले होते. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी आवश्यक असल्याची आ.राजुमामा भोळे यांची मागणी असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर लागलीच आ.राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. १०० कोटींच्या निधीतून शहराच्या उर्वरित भागातील रस्त्यांचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.