खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l जिल्ह्यात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, महेश महाजन, सोमवंशी इतर अधिकारी सहभागी होते.
गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार, करण लक्ष्मण गायकवाड (रा. कल्याणे होळ, ता. धरणगाव) चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असल्याचे समजले. पथकाने करण गायकवाड याला त्याच्या गावातून अटक केली. त्याच्या चौकशीत गोपाल सुरेश भिल (रा. वराड, ता. चोपडा) याचाही सहभाग उघड झाला. दोघांकडून १,२०,००० रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित एक मोटारसायकल शोधण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.