खान्देश टाइम्स न्यून l २८ ऑक्टोबर २०२४ l जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाकडे पहिले पाऊल मी मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर टाकणार आहे. मंगळवारी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असे प्रतिपादन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. जयश्री सुनिल महाजन यांनी सांगीतले.
मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शिवतीर्थावरुन तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.
गेल्या दहा वर्षातील भरकटलेला विकास मार्गावर आणण्यासाठी, निर्माण झालेला विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचेही प्रतिपादन जयश्री महाजन यांनी यावेळी केले. याप्रसंगी आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम तायडे, आपचे शहर संयोजक डॉ. सुनिल गाजरे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
दोन दिवसापूर्वीच सौ जयश्री महाजन यांची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर करण्यात आली होती. त्याचे स्वागत शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते.