खान्देश टाइम्स न्यूज | पाचोरा | आसिफ शेख | तु हिंदु बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा.. या ” धुल का फुल” चित्रपटाच्या गीतातील ओळी पाचोऱ्यात सत्यात उतरल्या आहेत. एका मुस्लिम युवकाने हिंदू बहीणीला रक्तदान करून तिचा जीव वाचविला आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतिक होते तर फाळणीनंतर दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ लागला. कोरोना महामारीच्या काळात पुन्हा हिंदू – मुस्लिम एकोपा पाहायला मिळाला आणि कुठेही वाद झाल्याचे ऐकावयास मिळाले नाही. सध्या पुन्हा राजकीय भांडवलदार सोयीचा जातीयवाद घेऊन पुढे येत आहेत. देशात अनेक ठिकाणी जातीय तेढ पाहायला मिळत असून अशा परीस्थितीत पाचोरा शहरात माणुसकीचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे.
शहरातील डॉ.वैभव सुर्यवंशी यांच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये आशा तुके नावाच्या महीलेला एका शस्त्रक्रियेसाठी एबी पॉझिटिव्ह रक्ताची अंत्यत गरज होती. नातेवाईकांनी ही बाब कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना कळविली असता सोमवंशी यांनी त्यांच्या कॉंग्रेस इंजिनिअरिंग सेलचे अध्यक्ष रहीम रमजान शेख या अभियंता युवकाला निरोप देत रक्तदानासाठी बोलावून घेतले. शेख यांनी रक्तदान केल्यावर आशा तुके या महीलेला जीवदान मिळाले खरे मात्र या घटनेने धर्माच्या अगोदर माणुसकी किती महत्वाची आहे याचा प्रत्यय आला. देशात सध्या चाललेल्या जातीयवादी राजकारणाला ही एक चपराक म्हणावी लागेल. घटनेतून आजही आम्ही एकच असल्याचा संदेश मिळाला.
मुस्लिम युवकाने रक्तदान केल्याने आशा तुके या हिंदु बहीणीला जीवनदान मिळाले आहे. या घटनेनंतर १९५९ मध्ये गाजलेला चित्रपट ‘धुल का फुल’ मधील गितकार साहीर लुधियानवी यांनी लिहिलेल्या ‘तु हिंदु बनेगा न मुसलमान बनेगा.. इंसान की औलाद है इन्सान बनेगा..’ याचा प्रत्यय आला. रक्तदानासाठी स्वतः हुन पुढे यावे. आपल्या रक्तदानाने एकाला जीवनदान मिळते. रक्तदान हे श्रेष्ठदान असून सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले आहे. आशा तुके यांच्या नातेवाईकांनी रहीम शेख या युवकासह कॉंग्रेसचे सोमवंशी यांचे आभार मानले आहे.