जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयुष्मान भारत योजनेचा व्यापक प्रसार; नागरिकांना मोफत व दर्जेदार उपचाराचा थेट लाभ

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयुष्मान भारत योजनेचा व्यापक प्रसार; नागरिकांना मोफत व दर्जेदार उपचाराचा थेट लाभ
जळगाव : जिल्ह्यातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत या उपक्रमाला गावोगाव चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातील 1159 ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर आयुष्मान भारत योजनेत लाभ देणाऱ्या 90 रुग्णालयांची यादी लावण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना आपल्या भागातील उपलब्ध रुग्णालयांची माहिती सहज मिळणार असून, उपचार घेणे अधिक सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः या मोहिमेचा नियमित आढावा घेत आहेत, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने यादी लावली असल्याची खात्री छायाचित्रांच्या माध्यमातून घेतली जात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना थेट फायदा
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा थेट लाभ मिळणार असून, विविध गंभीर आजारांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. शासनाच्या योजनांचा थेट लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.
काय आहे आयुष्मान भारत योजना?
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, देशातील गरीब व गरजू कुटुंबांना दरवर्षी ₹ ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा देते. या योजनेत सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करता येतात. हृदयरोग, कॅन्सर, अपघात, मूत्रपिंड विकार, मेंदू विकार, प्रसूती सेवा यांसह १३५० हून अधिक आजारांवर कॅशलेस आणि पेपरलेस प्रक्रिया राबवली जाते.
कोणते उपचार मोफत मिळतात?
या योजनेअंतर्गत हृदयविकार, मेंदूचे आजार, कॅन्सर, डोळे, मूत्रपिंड, हाडांची शस्त्रक्रिया, अपघातानंतरचे उपचार, मधुमेह, दमा, प्रसूती व बालरोग सेवा यांसारख्या उपचारांचा समावेश आहे.
योजना मिळवण्यासाठी प्रक्रिया
जवळच्या CSC किंवा आरोग्य सहाय्यक केंद्रात नाव तपासावे.
पात्र असल्यास आयुष्मान भारत कार्ड मिळवावे.
रुग्णालयात दाखल होताना कॅशलेस सेवा घेता येते.
अधिक माहितीसाठी https://mera.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
महाराष्ट्रातील अंमलबजावणी
महाराष्ट्र राज्यात आयुष्मान भारत योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना यासोबत एकत्रितपणे राबवली जाते. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दोन्ही योजनांचे लाभ मिळतात.