जळगाव– कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी व लेवागणबोली दिना निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यामार्फत जुने जळगावातील रामपेठ, चौधरीवाडा, बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कार्यक्रमाचे आयोजन येथे उद्या दि. ३ डिसेंबर ला सकाळी १० वाजता ‘स्मरण बहिणाईचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी हे बहिणाईंची गाणी आणि कविता कशी सुचते, ती कशी वाचावी याविषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. तसेच साहित्यिक प्राध्यापिका वंदना नेमाडे ह्या लेवागणबोलीचा गोडवा या विषयावर संबोधन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन असतील. या प्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त, बहिणाबाईंच्या नातसून, पणतसून, चौधरी वाड्यातील बंधू-भगिनी, साहित्यिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थींनी (ज्यांच्या अभ्यासक्रमात बहिणाईंची कविता समाविष्ट आहे) उपस्थित राहणार आहेत. याप्रंसगी उपस्थितीचे आवाहन ट्रस्टतर्फे समन्वयक अशोक चौधरी यांनी केले आहे.
*प्रमुख पाहुणे परिचय* – श्री. संजय चौधरी हे मराठीत दीर्घकाळापासून काव्यलेखन करणारे एक महत्त्वाचे कवी आहेत. काव्य लेखनासोबतच त्यांना असलेली कवितेची जाण खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत ‘माझं इवलं हस्ताक्षर’ (राजहंस प्रकाशन, पुणे) आणि ‘कविताच माझी कबर’ ( ग्रंथाली प्रकाशन, मुंबई) हे दोन काव्यसंग्रह त्यांनी मराठी साहित्य सृष्टीला दिलेले आहेत. या दोन्ही संघांना मानाचे – महत्त्वाचे जवळजवळ पन्नास पुरस्कार आणि जाणकार समीक्षकांचे प्रेम लाभलेले आहे. चिंतनशील पद्धतीने गंभीर काव्यलेखन करणारा हा कवी मानवी अस्तित्व, जीवनाचा आणि जगण्यातील चढ- उतारांचा वेगवेगळ्या अंगाने शोध घेऊ पाहतो. ‘माझ्या वयाची कविता’ हीदेखील आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडते. वयासाठी केवळ आकडा महत्वाचा नसून भावनिक वय महत्त्वाचे आहे, असा विचार ही कविता आपल्यापुढे ठेवते.
प्राध्यापक डॉ. वंदना नेमाडे ह्या कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे सीनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना कविता करण्याचा छंद असून त्यांच्या स्वलिखित १०० कविता आहेत.