
जिल्हाधिकाऱ्यांच्या वापरात असलेल्या वाहनावर नियमबाह्य नंबर प्लेट; तक्रारीनंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) –
जिल्हाधिकारी जळगाव यांच्या वापरात असलेल्या शासकीय वाहनावर नियमबाह्य पद्धतीने नंबर प्लेट लावण्यात आल्याची तक्रार नागरिक दीपककुमार पी. गुप्ता यांनी १० मार्च २०२५ रोजी ई-मेलद्वारे केली होती. या तक्रारीची दखल घेत परिवहन आयुक्तालय, मुंबई यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांना याप्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
या संदर्भात सहाय्यक परिवहन आयुक्त (अं-२) श्रीमती सुभाष धोंडे यांनी दि. १६ एप्रिल २०२५ रोजी एक स्मरणपत्र जारी केले आहे. यामध्ये पूर्वी दिनांक २४ मार्च २०२५ रोजी पाठवण्यात आलेल्या पत्रास अनुसरून त्वरित चौकशी अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अद्यापही अहवाल प्राप्त न झाल्याने तक्रारदार वारंवार संपर्क साधत असल्याचे नमूद करत, हा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे प्रशासनातील नियमांचे पालन आणि शासकीय वाहनांवरील नंबर प्लेटच्या वापराबाबतचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कायद्याचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य कृती होत असल्यास त्यावर तत्काळ कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत.
परिवहन विभागाने घेतलेली तत्पर दखल आणि चौकशीचे आदेश यामुळे या प्रकारावर प्रकाश पडण्याची अपेक्षा आहे. यापुढे अशा प्रकारच्या नियमभंगांना आळा बसेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.