यावल १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील अट्रावल येथे घडली होती या प्रकरणी ३० नोव्हेंबरला यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावल पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फर्दापूर येथून दोन तरुणांना अटक केली आहे. या दोघांना भुसावळ येथील विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अट्रावल येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाकडून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलीस नाईक किशोर परदेशी, अनिल पाटील या पथकाने केला. त्यांनी या अल्पवयीन मुलीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथून ताब्यात घेतले असून त्यानंतर तिच्या कुटुंबीयांकडे सोपवले. तर या मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील दोन १८ वर्षीय तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.