चाळीसगाव (प्रतिनिधी) :- खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरालवर सुटका झालेल्या फरार आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,दि. ६ डिसेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असताना एक इसम संशयास्पद संशयास्पद रित्या आढळून आल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे लोखंडी टामी,स्क्रू ड्रायव्हर असे घरफोडीचे साहित्य सापडले. अधिक चौकशी दरम्यान त्याने नाव अजयसिंग केवलसिंग ठाकुर (वय ३८ वर्षे, रा. वाडज, अहमदाबाद)असल्याचे सांगितले. त्याची माहिती घेतली असता वाडज पोलीस स्टेशन,अहमदाबाद अंतर्गत खुनाच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले.
तो साबरमती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटून कारागृहात परत न गेल्यामुळे राणीप पोलीस स्टेशन,अहमदाबाद येथे त्याच्यावर गुन्हा दाखल होता.चाळीसगाव पोलिसांनी तात्काळ अहमदाबाद गुन्हे शाखेला कळवून आरोपीस त्यांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक, जळगाव महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग कविता नेरकर,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पो.उ.नि.योगेश माळी,पो.उ.नि. संदीप घुले,पो.हे.कॉ.राहुल सोनवणे,पो.ना. भुषण पाटील,पो.ना.महेंद्र पाटील,पो.कॉ.विजय पाटील,पो.कॉ. ज्ञानेश्वर पाटोळे,वाहतूक शाखेचे पो.हे.कॉ.रणजित सोनवणे यांचा सहभाग होता.