डॉ भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम
गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम; सहभागाचे आवाहन
जळगाव- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येते. यापूर्वी रामदेववाडी, कुऱ्हाडदा, धानोरा, पद्मालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, शिरसोली येथे वृक्षारोपण, कुऱ्हाडदा शाळेत छत टाकून दिले होते.
यावर्षी शहरातील निवडक शाळांमध्ये सापशिडीसह विविध खेळांद्वारे “चारित्र्य निर्माणा”च्या मूल्य शिक्षणावर आधारित कार्यक्रमाचे दि. ११ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने गांधी रिसर्च फाऊंडेशनने एक सापशिडी तयार केली आहे. या खेळाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार असून संवाद साधण्यात येणार आहे. ज्या शाळांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी समन्वयक गिरीश कुलकर्णी (९८२३३३४०८४) यांचेशी संपर्क साधावा.
खालील शाळांचा सहभाग
या उपक्रमात जळगाव शहरातील खालील शाळांचा सहभाग राहणार आहे. दि. ११ डिसेंबर रोजी श्रीराम विद्यालय (प्राथमिक व माध्यमिक), शारदा विद्यालय व विद्या इंग्लिश मिडीयम स्कुल, दि. १२ डिसेंबर रोजी जय भवानी शिक्षण मंडळ संचालित या. दे. पाटील विद्यालय, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल (प्राथमिक व माध्यमिक), के. जी. मणियार प्राथमिक शाळा तर दि. १३ डिसेंबर रोजी ब. गो. शानभाग विद्यालय, जिजामाता विद्यालय (प्राथमिक व माध्यमिक) व शकुंतला माध्यमिक विद्यालय या संस्थांचा समावेश असणार आहे.