जळगाव, (प्रतिनिधी) : महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी यांचा पत्रकार विक्रम कापडणे यांचा कॅमेरा हिसकावून त्यामधून मेमरी कार्ड काढून घेतल्या प्रकरणी चाटे यांच्या विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की विक्रम कापडणे हे बातमी संकलित करण्यासाठी जळगाव मनपाच्या लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने व्हिडीओ शूटिंग करत असताना. तेथे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी येत कापडणे यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून एका कर्मचाऱ्याच्या हातात कॅमेरा देऊन त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले विक्रम कापडणे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम कापडणे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला. यावेळी घटना घडताना भांडारपाल आणि मनपातील काही कर्मचारी तेथे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय कार्यालयात शूटिंग करण्यास मनाई आहे असं काही आपल्याकडे जजमेंट आहे का? असा प्रश्न विचारला त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कापडाने यांना कॅमेरा परत दिला. या प्रकरणाचा शहर पोलीस तपास करीत आहे.