जळगाव l २२ जुलै २०२३ l राज्य सरकारने लहान बाळ असलेल्या मातांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कार्यालये आणि बस स्थानकात हिरकणी कक्ष स्थापन केले आहे. जळगाव शहरातील हिरकणी कक्षाची दयनीय अवस्था झाली असल्याची बाब निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांच्या पाहणीत लक्षात आली. पुढील आठवड्यात या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निधी फाउंडेशनतर्फे निवेदन देण्यात येणार आहे.
राज्य शासनाने स्तनदा मातांसाठी बस स्थानक, शासकीय कार्यालये परिसरात हिरकणी कक्ष उभारले आहेत. गेल्या अधिवेशनाच्या वेळी एक महिला आमदार मुलाला घेऊन आल्यानंतर देखील त्याठिकाणी हिरकणी कक्षचा मुद्दा उचलण्यात आला होता. जळगाव शहरात असलेल्या हिरकणी कक्षाची शुक्रवारी निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी पाहणी केली. अचानक केलेल्या पाहणीमध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत.
वैशाली विसपुते यांनी केलेल्या पाहणीत, जळगाव बस स्थानकात असलेल्या हिरकणी कक्षाची वाताहत झालेली होती तर जळगाव मनपात हिरकणी कक्षच नसल्याची बाब समोर आली आहे. इतर शासकीय कार्यालयात देखील हिरकणी कक्ष फारसे चांगले नसतील असे यावरुन दिसून आले. स्तनदा मातांच्या सोयीसाठी असलेला प्रत्येक हिरकणी कक्ष सुस्थितीत करावा, त्याठिकाणी असलेली विद्युत व्यवस्था, पंखे सुरू असावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापौर आणि इतर विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निधी फाउंडेशनतर्फे निवेदन देण्यात येणार आहे.
क्रीडा संकुलातील स्वच्छता गृहे नावालाच :
जिल्हा क्रीडा संकुलातील स्वच्छता गृहांची देखील निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी पाहणी केली. क्रीडा संकुलातील स्वच्छता गृहे नावालाच असून अस्वच्छता, दरवाजे नाही, पाणी नाही अशी अवस्था झाली आहे. तसेच नवीन बस स्थानकात देखील अस्वच्छतेचे प्रमाण अधिक असून प्रवाशांना त्याचा त्रास होत असतो. निधी फाउंडेशनच्या माध्यमातून याबाबत देखील निवेदन दिले जाणार आहे.