यावल ;- तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रातील डोंगर कठोरा ते हिंगोणा रस्त्यावर एका ट्रॅक्टर व्दारे अवैधरित्या विविध जातीच्या वृक्षांची तोड करून वाहतुक करतांना वाहनास वन विभागाच्या पथकाने मुद्देमालासह जप्त केल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
या संदर्भातील वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा ते हिंगोणा रस्त्या दरम्यान ८ मार्च २०२४ शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास वन विभागाचे पथक गस्तीवर असताना यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांना गुप्त माहितीच्या आधारावर त्यांच्या सहकारी पथकाने स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच २९ एम ४९८४या वाहनातुन अवैधरित्या निंब, करंज, सुबाभुळ जातीचे सुमारे १ लाख ७५ हजार रूपये किमतीचे ६.३०० घन मिटर जळाऊ लाकुड वाहतुक करणारे ट्रॅक्टर चालकासह दोन जणांना ताब्यात घेतले असून मुद्देमालासह ट्रॅक्टर यावल वन आगारातील विक्री केन्द्रात जमा करण्यात आले आहे.
याबाबत आगार रक्षक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डोंगर कठोरा वनपरिमंडलअधिकारी रविन्द्र तायडे व वन विभागाचे नाकेदार बी.बी, गायकवाड हे करीत आहे .