
चांदीच्या दरात पुन्हा उसळी; किलोमागे ५ हजारांची वाढ
सोन्याच्याही भावात तेजी; बाजारात खरेदीदारांचे वाढले लक्ष
जळगाव l प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून घसरण अनुभवलेल्या चांदीच्या दरात सोमवारी पुन्हा मोठी उसळी पाहायला मिळाली. चांदीच्या भावात तब्बल ५ हजार रुपयांची वाढ होऊन दर प्रति किलो २ लाख ७२ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्याचबरोबर सोन्याच्या भावातही ७०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली असून सोने १ लाख ५८ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
तीन दिवस घसरणीनंतर तेजी
१३ मे रोजी चांदीच्या दरात मोठी वाढ होत ती २ लाख ९३ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली होती. मात्र त्यानंतर १४ ते १६ मेदरम्यान बाजारात घसरण सुरू झाली आणि चांदीचा भाव कमी होऊन २ लाख ६७ हजार रुपयांवर आला होता. रविवारीही दर स्थिर राहिल्यानंतर सोमवारी पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाले.
सोन्यातही वाढ
चांदीसोबतच सोन्याच्या भावातही वाढ झाल्याने सराफा बाजारात हालचाली वाढल्या आहेत. जागतिक बाजारातील बदल, गुंतवणूकदारांची वाढती मागणी आणि आर्थिक घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारावरही दिसून येत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे
सोन्या-चांदीच्या दरातील सततच्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष सराफा बाजाराकडे लागले आहे. आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने अनेकजण खरेदीबाबत सावध भूमिका घेत आहेत.





