खान्देशराजकीयशासकीयसामाजिक

मनपा सुविधा देत नसेल, तर करमाफीचा ठराव करा!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी; नागपूर अधिवेशनात ठराव मंजूर करून आणण्याचे आव्हान

मनपा सुविधा देत नसेल, तर करमाफीचा ठराव करा!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी; नागपूर अधिवेशनात ठराव मंजूर करून आणण्याचे आव्हान

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील नागरिकांना आरोग्य, साफसफाई, दिवाबत्ती, रस्ते, गटारी आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरत असेल, तर नागरिकांना करमाफी देण्याचा ठराव महापालिकेत मंजूर करावा. तसेच आगामी नागपूर अधिवेशनात हा ठराव मंजूर करून आणावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केली आहे.

महापालिकेत सत्ताधारी नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यात अपयशी ठरत असताना त्याचे खापर प्रशासनावर फोडून शहराचे आमदार मोकळे होत आहेत, असा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी महापालिका प्रशासनाच्या बैठकीत ‘सुविधा देऊ शकत नसाल, तर नागरिकांकडून करवसुली बंद करा,’ अशी भूमिका मांडली होती. मात्र, महापालिका सुविधा देत असो वा नसो, नागरिकांना कर भरावाच लागतो, याकडेही पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

शहरातील व्यापारी गाळेधारकांचा गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला तीन टक्के दराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आमदार भोळे यांना नागरिकांविषयी खरोखरच तळमळ असेल, तर महापालिकेत बहुमताच्या जोरावर करमाफीचा ठराव मंजूर करून घ्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दिले आहे.

या मागणीसाठी पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, राजू मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत आदींनी भूमिका मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button