खान्देशजळगांव

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड थांबवा; NSUI ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड थांबवा; NSUI ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पर्यावरणीय परवानग्यांची चौकशी करण्यासाठी निवेदन; जिल्हाधिकाऱ्यांना वृक्षरोप भेट

जळगाव, प्रतिनिधी : भीमाशंकर परिसरालगत प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी NSUI जळगाव शहराच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून संबंधित वृक्षतोडीची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या पर्यावरणीय आणि वनविभागाच्या परवानग्यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

विकासाला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली निसर्गाची अपरिमित हानी होणे ही चिंतेची बाब आहे. पश्चिम घाटातील नैसर्गिक वनसंपत्ती, जैवविविधता आणि वन्यजीवांच्या अधिवासावर वृक्षतोडीमुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हजारो वर्षांपासून जपलेली वनसंपत्ती हा केवळ नैसर्गिक ठेवा नसून पुढील पिढ्यांचा वारसा आहे. त्यामुळे पर्यावरणीय परिणामांचा योग्य अभ्यास होईपर्यंत वृक्षतोड थांबविण्यासाठी संबंधित शासन व प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी NSUI जळगाव शहराच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना वृक्षरोप भेट देण्यात आले. निसर्गाप्रती आदर व्यक्त करण्यासोबतच पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

NSUI जळगाव शहराध्यक्ष अथर्व रंधे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे निवेदन सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button