
पाळधीतून बँड साहित्य चोरीप्रकरणी सात जण अटकेत; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पहूर (ता. जामनेर) : पाळधी गावातील बँड व्यवसायिकाच्या दुकानातून चोरीला गेलेले साहित्य पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढले. या प्रकरणी सात संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ६ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी रात्री पाळधी येथील बँड व्यवसायिक राहुल सदाशिव माळी यांच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात साहित्य चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यांनी तत्काळ पहूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई
गोपनीय माहिती, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीतच कारवाई केली. यात भूषण प्रकाश पाटील, आर्यन विलास पाटील, ज्ञानेश्वर अशोक पाटील, शुभम ज्ञानेश्वर पाटील, विशाल प्रकाश भुसारी, निखिल विनोद पाटील आणि वैभव रघुनाथ पाटील या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात विनोद पाटील, गोपाल माळी, राहुल पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी तसेच एलसीबीचे ईश्वर पाटील व राहुल महाजन यांनी विशेष भूमिका बजावली. पुढील तपास सुभाष पाटील करत आहेत.





