खान्देशजळगांवसामाजिक

पत्रकारिता क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर पूरक ठरेल – डॉ. युवराज परदेशी

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांशी संवाद

पत्रकारिता क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर पूरक ठरेल – डॉ. युवराज परदेशी
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांशी संवाद
जळगाव I प्रतिनिधी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा माध्यम क्षेत्रात बहुविध पद्धतीने वापर करून वेग आणि मजकुराची गुणवत्ता राखता येत असल्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माध्यम क्षेत्रासाठी पूरकच ठरेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. युवराज परदेशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर समिती सदस्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

यावेळी राज्य समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक सर्वश्री डॉ. गणेश मुळे, किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे, कृत्रिम तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञ तुषार भामरे, यांच्यासह समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी, रजत भोळे, चेतन गिरणारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. परदेशी म्हणाले की, वेगवेगळ्या क्षेत्रात आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयोगात आणले जात आहे. पत्रकारिता क्षेत्रातही त्याचा उपयोग होत आहे. माहितीचे विश्लेषण, संदर्भ मिळवण्यासाठी आणि कमीत कमी वेळात ती माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

एकाच विषयावरील माहितीचे अनेकप्रकारे विश्लेषण एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येते. बातमी लेखन करताना ते उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्य समितीचे अध्यक्ष श्री. जोशी यांनी, एआय तंत्रज्ञानाचा उपयोग हा पत्रकारितेत सकारात्मक पद्धतीने आवश्यक आहे. पत्रकाराची बातमी लिहितानाची संवेदना यासाठी एआय तंत्रज्ञान पर्याय ठरू शकत नाही. पत्रकाराचा अभ्यास, संवेदनशीलता, बातमी शोधण्याचे कसब याची तंत्रज्ञानाशी सांगड घातल्यास प्रभावी पत्रकारिता करता येते, असे सांगितले.

यावेळी डॉ. परदेशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यम क्षेत्रातील उपयोगाबाबत विविध पैलूंची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button