इतर

महात्मा गांधी विचारांमुळेच भारत विश्वगुरू बनेल- सतीशचंद मेहता

गांधीतीर्थ येथून ग्राम संवाद सायकल यात्रेस प्रारंभ

 

जळगाव प्रतिनिधी

गांधीजींचे संपूर्ण जीवन हाच एक संदेश आहे. त्यांच्या विचारांवर आपण चाललो तर भारत नक्कीच विश्व गुरू बनेल यात तीळमात्र शंका नाही असे मौलीक विचार मुख्य अतिथी सतीशचंद मेहता यांनी व्यक्त केले. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारा आयोजित ‘ग्राम संवाद सायकल यात्रे’च्या शुभारंगप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डीन गीता धर्मपाल आणि सहकारी डॉ. अश्विन झाला उपस्थित होते.

सकाळी ठीक साडे सात वाजता गांधी तीर्थच्या अॅम्फी थिएटर येथे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व उपस्थितांनी दोन मिनीट स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. आरंभी सर्वधर्म प्रार्थना झाली. श्री लक्ष्मी आश्रम कौसाली (उत्तराखंड)च्या विद्यार्थीनींनी ‘दे दी हमें आझादी बिना खडग् बिना ढाल, साबरमतीके संत तुने करदिया कमाल’ हे गीत सादर केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी नितीन चोपडा यांनी सूत्रसंचालन केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी उपस्थितांना सौहार्दपूर्ण वागणूक व देशाप्रती निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा दिली.

उपस्थितांशी संवाद साधताना जैन इरिगेशनचे संचालक सतीश मेहता म्हणाले की, अहिंसेचा मार्ग अवलंबून स्वातंत्र्य मिळविणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश होय. इंग्रजांना सौहार्दपूर्ण भारतातून पाठवून देणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. खरे पाहिले तर आजच्या काळात महात्मा गांधीजींच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. हिंसेने काहीच हाती लागत नाही हे या जगाला पटविणे आवश्यक आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी गांधी तीर्थची निर्मिती केली असे दूरदृष्टी असलेल्या भवरलालजी जैन यांनी महात्मा गांधीजींचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे खूप मोठे काम केलेले आहे. शेती आणि शेतकऱ्यांची प्रगती झाल्याशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही या दृष्टीने श्रद्धेय भाऊंनी केलेले कार्य खूप मोलाचे ठरते. जगभरात कुठेही गेले तर महात्मा गांधीजींना ओळखले जाते. आपल्या कार्यामुळे महात्मा गांधी विश्वात प्रख्यात झाले आहेत. प्रत्येकाने महात्मा गांधीजींच्या विचारांवर चालावे हा संदेश पोहोचविण्यासाठी ही सायकल यात्रा यशस्वी होवो या शुभेच्छा श्री. मेहता यांनी दिल्या. या कार्यक्रमानंतर लगेचच सतीशचंद मेहता, अशोक जैन आणि अशोक दलवाई यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल यात्रेस प्रारंभ करण्यात आला. बारा दिवस चालणाऱ्या या यात्रेत एकूण ४० सायकल यात्रींचा सहभाग आहे.

या वर्षी जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागातील जळगाव, चोपडा, यावल तालुक्यातून ही यात्रा मार्गस्थ होणार आहे. सुमारे ३०० कि.मी.चे एकूण सायकल प्रवासाचे अंतर असेल. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधला जाईल. या सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक अशा ४० जणांचा सहभाग आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, फ्रांन्स व नेपाळ या देशातील विद्यार्थ्यांचा यात्रेत समावेश आहे.

चारित्र्य निर्माणासह महिलांसाठी विशेष कार्यक्रम

यात्रेदरम्यान विविध शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी सापशिडी, मूल्य संवर्धनाचे खेळ, प्रश्नमंजुषा, कठपुतली खेळ या माध्यमातून चारित्र्य निर्माणाचे कार्य करणार आहे. तसेच ६ वेगवेगळया ठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे तर नागरिकांसाठी दररोज पथनाट्याद्वारे प्रबोधन कार्यक्रम करण्यात येणार आहे. यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यावरील प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे.

स्वस्थ व्यक्ती… स्वस्थ समाज या संकल्पनेनुसार निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button