
१० वी व १२ वी परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार
ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार
जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यामधून करण्याची कार्यवाही करण्यात यावी हे १७ जानेवारी रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.
मात्र या निर्णयाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत, त्यामुळे या निर्णयात अंशतः बदल करण्यात येत असून फेब्रुवारी-मार्च २०२५ व्या उत्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.
कोरोना काळातील सन २०२१ च सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेबुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी सबंधित व्यक्तीची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात इ. १० वी व इ. १२ वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहणार आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकायनि परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या भेटी होतील याचे नियोजन केले जाणार आहे.